- आरोग्य विभागाचा ठेकेदारांना फतवा; अन्यथा कारवाईचा इशारा..
- मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या मागणीची दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना ठेकेदार संस्थाकडून दिवाळी बोनस मिळावा, याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार पाठपुरावा सुरू केला होता. मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष रुपेश बाजीराव पटेकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत कामगारांना नियमाप्रमाणे एक महिन्याच्या पगाराएवढा बोनस द्यावा, अशी मागणी केली होती.
मनसेने स्पष्ट इशारा दिला होता की, “बोनस न दिल्यास आयुक्तांच्या दालनात दिवाळीचे फटाके फोडून निषेध नोंदवला जाईल.” यापूर्वीही बोनस वेळेत न दिल्याने आंदोलन करावे लागल्याचे पटेकर यांनी निवेदनात नमूद केले होते.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयातून पत्रक जारी करून तातडीने दखल घेण्यात आली आहे. पत्रात म्हटले आहे की, “कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या नियम व अटींनुसार दिवाळी बोनस देणे बंधनकारक आहे. संबंधित ठेकेदारांनी नियमांचे पालन करावे. बोनस रकमेची कपात करून किंवा पगारात समाविष्ट करून देणे चुकीचे आहे. ठेकेदारांनी कामगारांना थकबाकी बोनस लवकरात लवकर अदा करावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.”
या पत्रामुळे मनसेच्या मागणीला यश मिळाले असून, हजारो कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार आहे. बोनससाठी आंदोलने करावी लागू नयेत, यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा कामगारांकडून व्यक्त होत आहे.












