न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथील लोंढे चाळ भागात पावसाचे पाणी साचत असल्याच्या तक्रारीनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पावसाचे पाणी व सांडपाणी यांचे नियोजन स्वतंत्रपणे करण्याचे, ड्रेनेज लाईन नियमित साफ ठेवून कार्यक्षम करण्याचे तसेच गरजेनुसार नवीन लाईन टाकून क्षमतेत वाढ करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
पाहणीवेळी सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे, कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे यांच्यासह अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
जांभळे पाटील यांनी साचलेले पाणी, नालेसफाईची स्थिती, ड्रेनेज क्षमतेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. “पावसाळ्यात वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांवर अल्पकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना करणे हे महापालिकेचे प्राधान्य आहे. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वच्छतेला प्राधान्य देऊन तातडीने आवश्यक कामे सुरू केली जातील,” असे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.












