- वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २० सप्टेंबर २०२५) :- पिंपळे सौदागर परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सांगवी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारास १.०० वाजता फिर्यादी कमलेश गोविंदाराम पवार (वय २३, रा. रहाटणी) व त्यांचा मित्र आरोपी परवतसिंग रामसिंग (रा. लोहगाव, मूळ पत्ता – पाली, राजस्थान) हे रॉयल एनफिल्ड हंटर ३५० वरून यशदा चौक पी.एम.पी.एल. बसस्टॉप परिसरातून जात होते.
यावेळी आरोपी परवतसिंग याने दुचाकी भरधाव वेगाने, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवली. नियंत्रण सुटल्याने दुचाकी लोखंडी पोलवर आदळली. या अपघातात आरोपीला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला. तर फिर्यादी कमलेश पवार यांना पायासह इतर ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोउपनि. जावळे करत आहेत.












