- पाच लाखांहून अधिक नव्या मतदारांच्या वाढीने राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता?…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २०१७ नंतर आता होत असून, गेल्या पावणेनऊ वर्षांत तब्बल ५ लाख १६ हजारांहून अधिक मतदारांची वाढ झाली आहे. २०१७ मध्ये ११ लाख ९२ हजार इतकी असलेली मतदारसंख्या आता १७ लाखांच्या वर गेली आहे. चिंचवड मतदारसंघात ६ लाख ७९ हजार मतदार असून, भोसरीत ६ लाख २९ हजार आणि पिंपरीत जवळपास ४ लाख मतदार आहेत.
मतदारसंख्येतील ही वाढ सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता; परंतु त्यानंतरच्या काळात जनतेत नाराजी वाढल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. नवमतदारांचा कल जर बदलाच्या बाजूने असेल, तर राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेला त्याचा फायदा मिळू शकतो.
तरुण मतदारांची संख्या मोठी असल्याने रोजगार, वाहतूक कोंडी, दिवसाआड पाणिपुरवठा यासारखे मुद्दे निवडणुकीत महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपकडे संघटनाची ताकद व विकासाचा अजेंडा असल्याने नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील.
यंदाच्या निवडणुकीत ४५ ते ५५ हजार मतदारांचा प्रत्येक प्रभाग असणार असून, उमेदवारांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पाच लाख नव्या मतदारांचे मन जिंकणारा पक्ष महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करू शकतो.
                                                                    
                        		                    
							












