- विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी व्यावहारिक अनुभवाधारित शिक्षण देण्याचे नियोजन..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिल्ली येथील म्युन्सिपल स्कूलच्या धर्तीवर शिक्षण पॅटर्न राबविण्यात आला होता. त्यासाठी महापालिकेने मोठा खर्च करून शाळांच्या इमारतींमध्ये बदल, रंगरंगोटी, नामफलक, वर्गरचना तसेच बाकांची एकसमान मांडणी केली. मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले. या उपक्रमामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणपद्धतीत एकसुरीपणा आला.
आता, लडाख पॅटर्न राबविण्याचे नियोजन सुरू झाले आहे. त्यासाठी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बागर आणि २५ शिक्षकांनी नुकताच लडाखचा अभ्यास दौरा केला. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या शाळेत या शिक्षकांना व्यावहारिक अनुभवाधारित शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.
या २५ शिक्षकांकडून पुढील टप्प्यात उर्वरित शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना नवी शिक्षणपद्धती शिकविली जाईल. लडाख पॅटर्नमध्ये मातृभाषेत शिक्षण आणि व्यावहारिक ज्ञानावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमासोबत कौशल्य व आत्मविश्वास वाढणार असल्याचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले.
याआधी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी इंदूर शहराच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापन पॅटर्न सुरू करून यशस्वीपणे राबविला. त्याच धर्तीवर शिक्षण क्षेत्रातील नवा पॅटर्न महापालिका शाळांसाठी फायदेशीर ठरणार आहे.












