- आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे बुधवार, (दि. २४ सप्टेंबर २०२५) :- खेड तालुक्यातील सोळु गावातील ७० वर्षीय शेतकऱ्याची मोबाईल हॅक करून तब्बल २४ लाख ३५ हजार ५८३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विठ्ठल निवृत्ती ठाकुर (वय ७०, व्यवसाय – शेती, रा. सोळु, ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ते ७ सप्टेंबर २०२५ या दरम्यान अज्ञात इसमाने त्यांचा मोबाईल हॅक करून एचडीएफसी बँकेतील खात्यावर अनधिकृत प्रवेश मिळवला. आरोपीने ठाकुर यांचे फिक्स डिपॉझिट खाते क्रमांकातून ७०,००० रुपये मूळ रक्कम आणि ६,६३,९१६ रुपयांचे व्याज बचत खात्यावर ट्रान्सफर केले. त्यानंतर ५ व ६ सप्टेंबर रोजी विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम ट्रान्सफर करत एकूण २४,३५,५८३ रुपये लांबवले.
या प्रकारामुळे वृद्ध शेतकऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक झाली असून, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आळंदी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (८), ६६ (D) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेचा तपास वपोनि नरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.
ग्रामीण भागात अशा प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी व नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.












