- तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या नशिबी केवळ मरणयातनाच?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे बुधवार, (दि. २४ सप्टेंबर २०२५) :- तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी (माजी राज्य महामार्ग ५५) च्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ५९.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबतची घोषणा केली. मात्र, दररोज अपघात व वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या वाहनधारकांसाठी या मार्गाचे दर्जेदार रुंदीकरण व नूतनीकरण गरजेचे असताना सरकारने केवळ दुरुस्तीपुरताच निधी मंजूर केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
तळेगाव-चाकण दरम्यान चार पदरी उन्नत मार्गासोबत जमिनीवर समांतर चार पदरी रस्ता आणि चाकण-शिक्रापूर दरम्यान सहा पदरी रस्त्याचा समावेश आहे. संपूर्ण काम ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर होणार आहे.
मुळात हा रस्ता राज्य रस्ते विकास आराखडा २००१-२०२१ अंतर्गत होता. त्यानंतर भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी असा दर्जा दिला. मात्र हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे हस्तांतरित झाल्याने विकासकामांचा वेग मंदावला आहे.
या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी सातत्याने आवाज उठवला. नागपूर व मुंबई अधिवेशनात त्यांनी लक्षवेधी आंदोलन केले. आ. सचिन अहिर, आ. सुनील शेळके आणि आ. माउली आबा कटके यांच्यासह विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून या मार्गाच्या दुरवस्थेबाबत राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. तथापि, या आंदोलनाची ठोस दखल सरकारने घेतली नाही, अन्यथा आज निधी केवळ डागडुजीसाठी मंजूर झाला नसता, अशी चर्चा सुरू आहे.
“फक्त पॅचवर्क नको, तर दीर्घकालीन उपाय म्हणून दर्जेदार रस्ता हवा.” या मंजुरीनंतरही मार्गावरील अपघात आणि कोंडीची समस्या सुटेल का, याबाबत संभ्रम व्यक्त होत आहे.












