- नगर विकास विभागाने जारी केले परिपत्रक; ५१०० कोटींचा खर्च..
- प्रवाशांच्या दीर्घकाळच्या मागण्यांना मिळणार दिलासा – भालदार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २३ सप्टेंबर २०२५) :- पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरा आणि चौथा मार्ग उभारण्यासाठी नगर विकास विभागाने अखेर परिपत्रक जारी केले आहे. या प्रकल्पासाठी ५१०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के वाटा उचलणार आहेत. यामुळे गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या प्रवाशांच्या समस्यांवर काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
पुणे-लोणावळा ६३.८७ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर १७ स्थानके आहेत. १९८० च्या दशकात प्रवाशांनी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवावी, एक्सप्रेस गाड्यांना चिंचवड येथे थांबा मिळावा यासाठी मोठे आंदोलन केले होते. उपोषण, सत्याग्रह, अगदी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर काही एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला तसेच १९९६ मध्ये चिंचवड येथे आरक्षण केंद्र सुरू झाले. तरीही लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याच्या मागणीस रेल्वे प्रशासनाने कधीच प्रतिसाद दिला नाही.
पिंपरी-चिंचवड शहराची ४० लाखांची लोकसंख्या आणि वाढते औद्योगिकीकरण यामुळे प्रवाशांवर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला. मेट्रो प्रकल्प सुरू झाला असला तरी, १९८७ पासून लोकल सेवांमध्ये वाढ झाली नाही. यामुळे प्रवाशांचे आर्थिक, शारीरिक हाल होत असून, लाखो प्रवाशांना दररोज अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
२०१७ साली तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी पुणे-लोणावळा तिसरा आणि चौथा मार्गाला मान्यता दिली होती. त्यावेळी ४३०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, महापालिकांकडून आर्थिक वाटा न मिळाल्याने प्रकल्प थंड बस्त्यात गेला. आता राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समिती आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
नगर विकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, २०२५ ते २०२९ या कालावधीत गुंतवणुकीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
केंद्र शासन : २५५० कोटी
राज्य शासन : २५५० कोटी
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण : ७६५ कोटी
पुणे महानगरपालिका : ५१० कोटी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका : ५१० कोटी
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार तसेच पदाधिकारी व सल्लागारांनी राज्य शासनाचे आभार मानले असून, प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम वेळेत पूर्ण व्हावे आणि प्रवाशांच्या हितासाठी आवश्यक निर्णय होत राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी आकुर्डी आणि देहूरोड येथे नवीन रेल्वे स्थानके उभारावीत, कोरोना काळात बंद झालेल्या एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू कराव्यात आणि चिंचवड येथे अधिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, या मागण्यांवरही लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी पुढे केली आहे.












