- ‘आत्मनिर्भर भारत’अभियानावर भाजपची कार्यशाळा संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ सप्टेंबर २०२५) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मोरवाडी येथील पक्षाच्या शहर कार्यालयात करण्यात आले. या कार्यशाळेला अभियानाचे प्रदेश सहसंयोजक आमदार विक्रम पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आगामी ९० दिवस राबविण्यात येणाऱ्या अभियानाची रूपरेषा, उद्दिष्ट्ये आणि स्थानिक पातळीवरील नियोजन या कार्यशाळेत स्पष्ट करण्यात आले. पाचपुते म्हणाले, “हे केवळ सरकारी अभियान नसून प्रत्येक नागरिकाने स्वावलंबनाची दिशा स्वीकारून देशाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याची प्रतिज्ञा आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक वाढ ही या मोहिमेची केंद्रबिंदू ठरणार आहेत.”
शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी प्रत्येक वॉर्डात अभियानाचा प्रसार करण्याचे आणि स्थानिक कलाकार, लघुउद्योजक व महिला बचत गटांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. शहर संयोजक राजु दुर्गे यांनी ९० दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडत जनजागृती शिबिरे, ‘व्होकल फॉर लोकल’ प्रदर्शनं आणि कौशल्यविकास उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यशाळेत प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर नितीन काळजे, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, सरचिटणीस विकास डोळस, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, माजी नगरसेवक व मंडल अध्यक्षांसह विविध आघाडींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राम वाडकर यांनी लघुउद्योजकांसाठी विशेष शिबिरांची कल्पना मांडली, राजेंद्र बाबर यांनी युवांना कौशल्यविकासासाठी प्रोत्साहन देण्यावर भर दिला, तर गिरीश देशमुख यांनी शेतीपूरक उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
या कार्यशाळेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती मिळाली असून, रोजगाराच्या संधी वाढीस लागून स्थानिक उद्योग-व्यवसायाला नवा ऊर्जावान वाव मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.












