- असभ्य भाषेत वरिष्ठांना धमकी, मग भोसरी रुग्णालयात बदली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील एका फिजिशियन डॉक्टरवर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. अधिष्ठाता व वरिष्ठ डॉक्टरांशी असभ्य वर्तन आणि रुग्णसेवेतील हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले असून, त्यांची बदली भोसरी रुग्णालयात करण्यात आली आहे.
माहितीनुसार, मेडिसीन विभागात दाखल असलेल्या एका रुग्णाच्या उपचारात त्यांनी विनाकारण हस्तक्षेप करून कनिष्ठ निवासी डॉक्टर यांच्याशी अयोग्य भाषेत बोलत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. संबंधित रुग्णाने मात्र बाहेरून औषधे आणण्याचे निर्देश कोणत्याही डॉक्टरांनी दिले नसल्याचे लेखी निवेदन दिले. या घटनेनंतर त्यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून त्या डॉक्टरांना खुलासा सादर करण्यास सांगितले असता, त्यांनी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि इतर वरिष्ठांविषयी अवमानकारक भाषा वापरली. या वर्तनामुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे विभागप्रमुखांनी अहवालात नमूद केले आहे.
रुग्णसेवा ही अत्यंत संवेदनशील बाब असल्याने जबाबदारीचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत.












