- मुख्यमंत्री कार्यालयाच्या चौकशी आदेशाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागात अनेक वर्षांपासून एकाच पदावर कायम कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी करदाता सामान्य नागरिक राहुल कोल्हटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कोल्हटकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, लेखा विभागात भ्रष्टाचाराचे प्रकार सुरू असून ठेकेदारांच्या देयकांसाठी चिरीमिरी घेतली जाते. ३१ जुलै रोजी लेखा विभागातील एका कर्मचाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यास अधिक काळ लोटल्यानंतरही मनपा प्रशासनाने कारवाई केली नाही.
यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी ई-मेलद्वारे मुख्यमंत्रींकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाने ११ ऑगस्ट रोजी मनपाला चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप चौकशी पूर्ण झाली नाही किंवा संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप कोल्हटकर यांनी केला आहे.
शासकीय नियमांनुसार एकाच पदावर किंवा विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकच अधिकारी किंवा कर्मचारी कार्यरत राहू शकत नाही. तरीही लेखा विभागातील अधिकारी, लिपिक, शिपाई हे गेल्या अनेक वर्षांपासून पदोन्नतीनंतरही त्याच पदावर आहेत. ठेकेदारांशी त्यांच्या आर्थिक हितसंबंध तयार झाले आहेत. त्यामुळे, लेखा विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांची तातडीने बदली करून भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी ठाम मागणी करदाता नागरिक राहुल कोल्हटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मे महिन्यात बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. तरीही याबाबतची माहीती घेऊन कार्यवाही केली जाईल.
– मा. अजिंक्य येळे, सहाय्यक आयुक्त – सामान्य प्रशासन विभाग मनपा…












