- कामातील गुणवत्ता आणि कार्यक्षमता निश्चित करण्यासाठीचा टप्पा महत्त्वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू केलेल्या भामा-आसखेड धरण प्रकल्पातील कामे अजूनही अपूर्ण आहेत. जॅकवेलचे काम सुमारे ८५ टक्के आणि पाईपलाईनचे काम ६५ टक्केच पूर्ण झाले आहे.
दरम्यान चाकण-तळेगाव महामार्गावर टाकलेल्या पाईपलाईनची हायड्रॉलिक चाचणी सध्या सुरू असून प्रत्यक्ष दोनशे मीटर अंतरावर ही तपासणी करण्यात येत आहे.
या चाचणीत प्रेशरद्वारे पाईपची क्षमता तपासली जात असून, कामातील गुणवत्ता आणि कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. या चाचणीमुळे पुढील कामांमध्ये वेग येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या योजनेची सुरुवातीची पूर्णत्वाची मुदत डिसेंबर २०२४ होती. त्यानंतर डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता नवी मुदत मार्च २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी, भूसंपादन, विद्युत जोडणी व काही स्थापत्य कामे शिल्लक असल्याने वेळेत काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे नागरिकांना अपेक्षित दररोजचा पाणी पुरवठा सुरू होण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
“चाकण-तळेगाव महामार्गावरील पाईपलाईनची हायड्रॉलिक टेस्टिंग सुरू आहे. टप्प्याटप्प्याने दोनशे मीटर अंतरावर दाब चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यातून पाईपची क्षमता आणि सुरक्षितता तपासून पुढील जोडणीचे काम हाती घेतले जाईल.”
– अजय सुर्यवंशी, सहशहर अभियंता (पाणीपुरवठा विभाग)…












