- FSSAI व मनपाच्या कार्यशाळेत गोंधळ; महिलांकडून तीव्र निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने फेरीवाल्यांसाठी आयोजित स्वच्छता व खाद्यसुरक्षा कार्यशाळा तीव्र गोंधळ आणि संतापाच्या वातावरणात पार पडली. “लायसन्स आणि प्रमाणपत्र मिळणार,” अशा खोट्या आश्वासनाने आम्हाला इथे बोलावले गेले, पण प्रत्यक्षात फक्त प्रशिक्षणच होत आहे, हे समजल्यावर आमची फसवणूक झाल्याची भावना झाली, असा संतप्त आरोप फेरीवाल्यांनी केला.
रामकृष्ण मोरे सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत महिलांनी विशेषतः मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. परंतु, कार्यक्रमाचे श्रेय लाटण्यासाठी काही व्यक्तींनी बॅनरबाजी करून शासकीय कार्यक्रमाला ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही करण्यात आला. त्यामुळे उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
या कार्यक्रमात FSSAI पश्चिम विभागाच्या सहाय्यक संचालिका जाती हरणे, तांत्रिक अधिकारी आरशाला पाटील, विभागीय व्यवस्थापक शशांक पांडे, पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे, फेरीवाला समिती सदस्या आशा कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मूळ उद्देश फेरीवाल्यांना स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांबाबत मार्गदर्शन करणे हा होता.
“गोरगरीब फेरीवाल्यांच्या भावनांशी खेळण्यात आला आहे,” असे सांगून डॉ. बाबा कांबळे यांनी याचा निषेध केला. तर कार्याध्यक्ष बळीराम काकडे म्हणाले, “ही सरळसरळ फसवणूक आहे. खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.” एकंदरीत, विधायक उद्देशाने आयोजित कार्यशाळेला चुकीच्या माहितीमुळे गालबोट लागले असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.












