- दोन हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग; स्वच्छतेची घेतली शपथ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ” या उपक्रमांतर्गत निगडीतील भक्ती शक्ती चौकात आज स्वच्छतेचा महाउत्सव साजरा करण्यात आला. दोन हजारांहून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून स्वच्छतेची शपथ घेतली आणि शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. या मोहिमेद्वारे भक्ती शक्ती चौक परिसरात जवळपास १२ टन कचरा गोळा करण्यात आला.
मोहिमेचा शुभारंभ आमदार उमा खापरे आणि आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते झाला. यावेळी त्रिपुरा राज्यातील आगरतळा महापालिकेच्या अधिकारी पथकासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, “स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये शहराने राज्यात प्रथम आणि देशात सातवा क्रमांक मिळवला. पुढील सर्वेक्षणात देशात अग्रक्रम मिळवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.” कार्यक्रमात ‘फिट माय सिटी’च्या झुंबा सादरीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच २०२५ साठीच्या नवीन ब्रँड ॲम्बेसिडरची घोषणा करून त्यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्यांनी दरवर्षी १०० तास श्रमदान करण्याची शपथ घेतली. यावेळी आयोजित स्वाक्षरी मोहिमेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.












