- व्यवस्थापकीय संचालक राज मुच्छाल यांच प्रतिपादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड, (दि. २६ सप्टेंबर २०२५) :- चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मध्ये एमबीए व एमसीए विद्यार्थ्यांच्या इंडक्शन कार्यक्रमाचे उद्घाटन गोपिसन अटायर अँड लाइफस्टाईल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राज मुच्छाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व सचिव डॉ. दीपक शहा होते. यावेळी व्यासपीठावर खजिनदार भूपाली शहा, डॉ. तेजल शहा, संचालक डॉ. सचिन बोरगावे, विभाग प्रमुख प्रा. गुरुराज डांगरे आणि प्रा. मनीष पाटणकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज मुच्छाल म्हणाले, “आयुष्यात नैराश्य तेव्हा येते जेव्हा आपल्यामध्येच कमतरता असते. यासाठी स्वतःत बदल घडवा, वेळेचा अपव्यय टाळा, ज्ञान आत्मसात करा, ध्येय सकारात्मक ठेवा, संभाषण कौशल्य आत्मसात करा व भाषेवर प्रभुत्व मिळवा. मदत करा पण त्याचे भांडवल करू नका. आव्हानांना सामोरे जा, प्रसंगी तज्ञांची मदत घ्या व ध्येय निश्चितीकडे प्रामाणिकपणे प्रयत्न करा.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. दीपक शहा म्हणाले, “विद्यार्थ्यांनो, आभासी जगात जगू नका. ध्येयपूर्तीचा ध्यास घ्या. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे असेल ते कृतीरूपाने सिद्ध करा. अवांतर वाचन करण्याची सवय लावा.”
प्रास्ताविक करताना डॉ. सचिन बोरगावे म्हणाले की, “नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, स्वयंशिस्त अंगीकारा आणि गुणांच्या मागे न जाता स्पर्धेत स्वतःला सिद्ध करा.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महिमा सिंह यांनी केले, तर आभार प्रा. जेसीका गोडेटी यांनी मानले.












