- जामखेड, सुरगाणा, लांखादूर, मंचर, आळंदी यांचा स्वच्छ शहर जोडी उपक्रमात समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२५) :- भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “स्वच्छ शहर जोडी (SSJ) उपक्रमात” पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवड देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मार्गदर्शक शहरांमध्ये झाली आहे. या यशस्वी निवडीमुळे पिंपरी चिंचवड महापालिका आता लहान शहरांसाठी आदर्श ठरणार आहे.
या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शहरांना, उत्तम कामगिरी करण्यासाठी काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका सुरगाणा नगरपंचायत (जि. नाशिक), लांखादूर नगरपंचायत (जि. भंडारा), मंचर नगरपंचायत (जि. पुणे), जामखेड नगरपरिषद (जि. अहिल्यानगर), आळंदी नगरपरिषद (जि. पुणे) या पाच नगरपरिषद व नगरपंचायतींना मार्गदर्शन करणार आहे.
या संदर्भातील सामंजस्य कराराचा कार्यक्रम ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे पार पडला. केंद्रीय मंत्री मोहनलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत हा करार झाला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी करारावर स्वाक्षरी केली.
कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य विभाग प्रमुख व उप आयुक्त सचिन पवार यांच्यासह संबंधित नगरपरिषदांचे मुख्याधिकारी महादेव खांडेकर (आळंदी), अजय साळवे (जामखेड), गोविंद जाधव (मंचर), सचिन कुमार पटेल (सुरगाणा) आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह यांनी या नगरपरिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, संकलन व प्रक्रिया प्रणालींचा सविस्तर आढावा घेतला. या संदर्भात ते म्हणाले “पिंपरी चिंचवड महानगरपालिका या सर्व नगरपरिषदांना स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी साध्य करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल अनुभव, तंत्रज्ञान व व्यवस्थापन पद्धतींचा लाभ या संस्थांना दिला जाईल.”
आरोग्य विभाग प्रमुख सचिन पवार यांनी देखील महापालिकेच्या यशस्वी प्रकल्पांची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, “या नगरपरिषदांच्या कामगिरीत सातत्याने वाढ होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा, मार्गदर्शन आणि सहकार्य वेळोवेळी केले जाईल.”
स्वच्छ भारत मोहिमेच्या पुढील टप्प्यात पिंपरी चिंचवड महापालिकेने फक्त स्वतःच्या शहरापुरती मर्यादा न ठेवता इतर शहरांना सक्षम करण्याचा पुढाकार घेतला आहे. यामुळे स्वच्छतेच्या दिशेने एकात्मिक आणि सामूहिक प्रगती घडून येणार आहे.
















