- अमेरिकेत एस्एई इंटरनॅशनल बाहा स्पर्धेत पीसीसीओईचे विद्यार्थी करणार देशाचे प्रतिनिधीत्व
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- अमेरिकेत होणा-या ‘एस्एई इंटरनॅशनल बाहा’ या स्पर्धेसाठी पीसीसीओईच्या ‘ऑल टेरेन ’टिमची निवड झाली आहे. अमेरिका न्यूयॉर्क येथील रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वतीने दरवर्षी जगभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा भरविण्यात येते.
या वर्षीच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयास (पीसीसीओई) मिळाली आहे. या स्पर्धेत ‘ऑल टेरेन’ प्रकारचे डिझाईन केलेले वाहन ‘टिम रेड बॅरन’ चे विद्यार्थी सादर करणार आहेत. “टीम रेड बॅरन” ने गतवर्षी झालेल्या तत्सम राष्ट्रीय स्पर्धेत लक्षणीय यश मिळविले होते. त्यामुळे ६ जून ते ९ जून २०१९ या कालावधीत अमेरिकेत होणा-या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविण्याची संधी पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
या स्पर्धेस जगभरातील नामांकित शंभर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संघ सहभागी होणार आहेत. या टिम रेड बॅरनचे मेकॅनिकलचे अकरा विद्यार्थी व मार्गदर्शक प्रा. उम्मीद शेख हे शनिवारी १ जूनला अमेरिकेस रवाना होणार आहेत. त्यांना पीसीईटीचे सचिव व्हि. एस. काळभोर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर उपस्थित होते.











