- दोन्ही प्रभागातील सर्वसाधारण जागेवर ‘एससी’ आणि ‘एसटी’चा शिरकाव?..
- माजी सत्तारूढ पक्षनेता आणि माजी उपमहापौरांची झाली गोची?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा बिगुल औपचारिकपणे वाजला आहे. सोमवारी प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्याने आता आरक्षण सोडतीच्या प्रतीक्षेने राजकीय वातावरण तापले आहे. या रचनेनुसार १२८ सदस्यीय महापालिकेत एकूण २० प्रभाग अनुसूचित जातींसाठी आणि तीन प्रभाग अनुसूचित जमातींसाठी आरक्षित राहणार आहेत.
या बदलांमुळे प्रभाग सतरा येथील चिंचवडेनगर आणि दापोडी प्रभागांमधील सर्वसाधारण गटातील इच्छुक उमेदवारांचे गणित पूर्णपणे बदलले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने केलेल्या वॉर्ड फोडणीमुळे मित्रपक्षांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण कुठे?..
अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण प्रभागातील मतदारसंख्येच्या उतरत्या क्रमाने निश्चित केले जाते. त्यानुसार प्रभाग क्रमांक ४ (दिघी), २९ (पिंपळे गुरव) आणि ३० (दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी) हे प्रभाग अनुसूचित जाती व जमाती दोन्ही प्रवर्गांसाठी आरक्षित राहतील.
अनुसूचित जातींसाठी आरक्षित २० प्रभाग…
मोशी (३), दिघी (४), इंद्रायणीनगर (८), नेहरूनगर (९), संभाजीनगर (१०), पूर्णानगर (११), यमुनानगर (१३), रावेत (१६), चिंचवडेनगर (१७), श्रीधरनगर-भाटनगर (१९), संत तुकारामनगर (२०), पिंपरी (२१), थेरगाव (२३), ताथवडे-वाकड (२५), पिंपळे निलख (२६), रहाटणी (२७), पिंपळे गुरव (२९), दापोडी-कासारवाडी (३०), नवी सांगवी-उरो रुग्णालय (३१) आणि जुनी सांगवी (३२).
आरक्षण बदलांमुळे निर्माण झालेली नवी समीकरणे…
- प्रभाग क्रमांक २४ (पदमजी पेपर मिल) हा प्रभाग फोडल्याने येथील अनुसूचित जातीचे आरक्षण चिंचवडेनगर (१६) कडे गेले आहे.
- यामुळे भाजपच्या चिंचवडमधील पारंपरिक बालेकिल्ल्याला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
- प्रभाग १७ मध्ये ओबीसी व सर्वसाधारण जागांची रचना बदलून एससी आरक्षण लागू झाल्याने नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे आणि शेखर चिंचवडे यांच्यासह अनेक नेत्यांचे राजकीय गणित बिघडले आहे.
- दरम्यान, धावडे वस्ती (प्रभाग ६) येथील एसटी आरक्षण काढून ते दापोडी (३०) येथे वर्ग करण्यात आले आहे.
- त्यामुळे दापोडीतील काटे बंधूंसारख्या सर्वसाधारण गटातील इच्छुकांची कोंडी होणार आहे.
चार सदस्यीय ३२ प्रभागांची रचना निश्चित झाल्याने महापालिकेत एकूण १२८ सदस्य निवडून येणार आहेत. आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाला आपली उमेदवार यादी नव्याने आखावी लागेल. प्रभागांचे आरक्षणच निवडणुकीची दिशा ठरवणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.