- पीएमआरडीएची चार नवीन विभागीय कार्यालये सुरू; स्थानिकांना दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे | बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ :- पुणे जिल्ह्यातील नागरिकांना पीएमआरडीएच्या (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) कार्यालयात परवानगीसाठी आणि नागरी कामांसाठी हेलपाटे मारण्याची गरज आता उरणार नाही. पीएमआरडीएने चार नवीन विभागीय कार्यालये सुरू करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. या कार्यालयांमधून बांधकाम परवानगी, नियोजन विषयक कामे आणि स्थानिक तक्रारींचे निराकरण थेट तालुकास्तरावर होणार आहे.
पीएमआरडीएअंतर्गत एकूण ९ तालुके आणि ८१३ गावे येतात. मात्र आतापर्यंत सर्वांना पुणे किंवा आकुर्डी येथील मुख्यालयात जावे लागत होते. त्यामुळे वेळ, खर्च आणि त्रास वाढत होता.
पीएमआरडीएची हवेलीत दोन कार्यालये आहेत. त्यापैकी औंध आणि हवेली येथे सुरू आहे. तसेच, मुळशीतील चांदे, पुरंदर तालुक्यात सासवड आणि वाघोली या नव्या विभागीय कार्यालयांत उपअभियंता, सहाय्यक महानगर नियोजक, लिपिक आणि शिपाई अशी स्वतंत्र टीम नेमण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांना बांधकाम परवानगी, आराखडा मंजुरी, क्षेत्र नियोजन, भूखंड संदर्भातील सर्व कामे आता स्थानिक स्तरावर करता येणार आहेत.
“पूर्वी नागरिकांना छोट्या कामांसाठी शहरात यावे लागायचे. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते. नवीन कार्यालयांमुळे गावागावातील समस्या आता स्थानिक पातळीवरच सोडवता येतील. यामुळे कामकाज पारदर्शक आणि वेगवान होईल. पीएमआरडीएने आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणी नवीन कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.” – पुनम मेहता, सह आयुक्त – प्रशासन विभाग पीएमआरडीए…