न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी | ८ ऑक्टोबर २०२५ :- गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आश्वासन देत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मल्टिपल निधी लिमिटेड नामक पतसंस्थेविरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शिवदास जिवराज घुले (वय ४०, रा. भारतमाता चौक, मोशी) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
सन २०२२ पासून आजपर्यंत आरोपींनी फिर्यादी तसेच त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून संस्थेतील फिक्स डिपॉझिट आणि इतर गुंतवणूक योजनांमध्ये चांगला परतावा मिळेल, असे सांगत एकूण २६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम घेतली. मात्र, ठरलेल्या मुदतीनंतरही कोणताही परतावा दिला नाही. फिर्यादींची १८ लाखांची फसवणूक झाली असून त्यांच्या ओळखीच्या अशोक वणवे यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊनही परतावा न दिल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारे एकूण २१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी उन्नेश्वर यादव, ज्ञानेश्वर यादव, महिला आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि कामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आणि कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संस्थेची पडताळणी करण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.