न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे | बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ :- तळेगाव-चाकण रोडवरील आरंभ हॉटेलसमोर एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने गंभीर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात विधी संघर्षित बालक आणि एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रशांत भागवत वाघमारे (वय ४६, रा. तळेगाव दाभाडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा प्रशिक हा शाळेतून घरी येत असताना आरोपींनी त्याला रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात प्रशिक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.