- अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेचे निर्णायक पाऊल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने निळ्या पूररेषेतील जमिनींच्या अनधिकृत खरेदी-विक्रीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या निळ्या पूररेषेत असलेल्या जमिनींचे कोणतेही व्यवहार करू नयेत, असे पत्र महापालिकेने राज्य मुद्रांक आणि नोंदणी विभागासह सह-दुय्यम निबंधक विभागाला पाठवले आहे.
महापालिकेच्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, या नद्यांच्या पूररेषेत येणाऱ्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, दस्तऐवज नोंदणी आणि हस्तांतरण तात्काळ थांबवावे. शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या किनाऱ्यांवर अनधिकृत व्यवहारांमुळे अतिक्रमण आणि बांधकामे झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यवहारांवर बंदी आली तर अनधिकृत बांधकामांना आळा बसेल, अशी महापालिकेची अपेक्षा आहे.
महापालिकेने इंद्रायणी आणि पवना नदीच्या किनाऱ्यांवरील बेकायदेशीर बांधकामांवरही कारवाई सुरू केली आहे. मागील काही महिन्यांत अनेक अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली असून, पुन्हा अशी बांधकामे होऊ नयेत म्हणून महापालिकेने संबंधित विभागांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
“अनधिकृतपणे जमिनींचे व्यवहार होत आहेत. यामुळे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचेही प्रमाण वाढत आहे. या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार थांबले तर अनधिकृत बांधकामांना आळा बसेल. यामुळे अशा जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, यासाठी महापालिकेने सहदुय्यम निबंधकांना पत्र दिले आहे.” – अतुल पाटील, सहायक आयुक्त, महापालिका…