- प्रलंबित रस्ता प्रकल्प मार्गी; भूमापन आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव | बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ :- देहू कमान ते काळोखे चौक (विठ्ठलनगर) दरम्यानचा ३० मीटर रुंदीचा आणि १.६ किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा रस्ता विकास प्रकल्प अखेर गती घेणार आहे. अनेक वर्षांपासून अडथळ्यात सापडलेला हा रस्ता प्रकल्प आता मार्गी लागण्याच्या मार्गावर असून, हवेलीचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बाधित शेतकऱ्यांनी विकासकामाला सहमती दर्शवली आहे.
या बैठकीत तहसीलदार जयराज देशमुख, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगर अभियंता संघपाल गायकवाड, नगररचना विभागाचे सुरेंद्र आंधळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अश्विनी पाटील, नगरसेवक योगेश काळोखे, माजी उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, मंडळ अधिकारी दिनेश नरवडे, तलाठी नकुशा लोखंडे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत रस्त्याचे भूमापन करून हद्द निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींचे पंचनामे व खरेदीखत तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. काही शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यातील विसंगती दुरुस्त करून नोंदी सुसंगत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नगरसेवक योगेश काळोखे यांनी या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधत सर्वांची सहमती मिळवून दिली. त्यामुळे कोणतीही हरकत न घेता प्रकल्प मार्गी लागला आहे. मोबदला स्वीकारूनही खरेदीखत न दिलेल्या शेतकऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
रस्ता मोजणी आणि हद्द निश्चितीनंतर जमीन ताब्यात घेऊन ती शासन निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित केली जाईल. त्यानंतर पुढील सर्व विकासकामे महापालिकेमार्फत पार पडतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अश्विनी पाटील यांनी सांगितले.