न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड | बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी परतीच्या पावसाने अक्षरशः जेर धरला. दुपारी तीन वाजेपर्यंत उन्हाचे चटके जाणवत असताना, चारच्या सुमारास चिंचवडगाव परिसरात अचानक धुवांधार पावसाला सुरुवात झाली. काही क्षणांतच वातावरण बदलले आणि मुसळधार सरी कोसळू लागल्या.
अचानक आलेल्या या पावसामुळे शाळा सुटल्यानंतर मुलांना आणण्यासाठी गेलेल्या पालकांची एकच धांदल उडाली. अनेक शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक रस्त्यांवर अडकले आणि त्यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. काही भागांत रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.
सुमारे अर्धा तास मुसळधार सरी कोसळल्यानंतर पावसाचा जोर ओसरला, मात्र ओले रस्ते आणि थंड वाऱ्यामुळे वातावरण आल्हाददायक बनले. परतीच्या पावसाने शहरवासीयांना अनपेक्षित अनुभव दिला असून, हवामान खात्याने पुढील काही दिवस हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे.