न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी व इतर अनेक गावांत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सतत होत असतो. भोसरीतील पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये बाधित नागरिक गेले असता, तेथे व वायसीएममध्येही रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याचे कळविण्यात येते. पालिकेच्या सर्व रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक तसेच इतर सर्व जीवनावश्यक औषधे तीन महिने पुरतील इतका बफर स्टॉक ठेवावा, याबाबत सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना काही दिवसांपूर्वी पत्र पाठविले होते.
याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय मुख्य कार्यालयाने अति. आरोग्य वैद्यकिय अधिकारी यांच्या सहीने सामाजिक कार्यकर्ते ॲड. सचिन गोडांबे यांना पत्र पाठविले आहे. यात म्हटले आहे की, उपरोक्त विषयान्वये आपण टोकन क्र. MW4479 दि. ७/४/ २०१९ अन्वये रेबिज प्रतिबंधक लस उपलब्ध नसलेबाबत सारथीवर सोशल मिडीयाच्या माध्यमातुन तक्रार नोंदविलेली आहे. सदर तक्रारीचे अनुषंगाने पुढीलप्रमाणे माहिती देणेत येत आहे.
सन २०१६ मध्ये औषध खरेदी निविदा प्रक्रिया राबवून रुग्णालये, दवाखान्यासाठी औषध साहित्य खरेदी करुन, वितरीत करणेत येत आहेत. जानेवारी २०१९ मध्ये नविन निविदेची प्रक्रिया राबविणेत आलेली असून, आचारसंहितेमुळे मान्यता मिळणेकामी विलंब झालेला आहे. सन २०१६ मध्ये झालेल्या निविदेकरिता मुदतवाढ देणेत आलेली असुन, Inj. Anti. rabies 1ml चा बाजारपेठेमध्ये दर वाढल्यामुळे तुटवडा निर्माण झाल्यामुळे निविदाधारकाने सदरचे इजेक्शन पुरविणेस असमर्थता दर्शविलेली आहे. तातडीची बाब म्हणुन विभागस्तरावर १ मार्च पासुन उपलब्धतेनुसार Inj. Anti. rabies ०.५ ml वेळोवेळी रुग्णालयस्तरावर वितरीत करणेत आलेले आहेत. वेळोवेळी खरेदी करुन औषधाची साठा पातळी राखली जाते.
बाजारपेठेतील वाढलेले दर, जुन्या निविदा समाप्त झालेला कालावधी, मुदतवाढीमध्ये निविदाधारकांची औषधे साहित्य पुरवणेकामी असमर्थतता तसेच निविदा प्रक्रियेला आचारसंहितेमुळे लागलेला विलंब यामुळे सदयस्थितीत Inj. Anti. rabies चा तुटवड़ा निर्माण झालेला आहे. तरीही विभागस्तरावर उपाययोजना करुन उपलब्ध करून, देणचे प्रयत्न सुरु आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.













