- बीडच्या महिला व्यावसायिकेच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे एमआयडीसी | गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ :- सरकारकडून संलग्न करण्यात आलेली मालमत्ता विक्री करून मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीडच्या एका महिला व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित घटना दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता, निघोजे गाव, ता. खेड, जि. पुणे येथे घडली.
या प्रकरणी फिर्याद शैलेंद्रकुमार रविंद्रकुमार गुप्ता (वय ५० वर्षे), सहायक संचालक, नेमणूक प्रवर्तन निदेशालय (ED), भारत सरकार, मुंबई परिमंडळ-०१ यांनी दिली आहे.
आरोपी ही ४४ वर्षीय महिला व्यावसायिक असून तिने शासनाचे आदेश मोडून बेकायदेशीर व्यवहार केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
फिर्यादीनुसार, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (PMLA) च्या कलम ५ आणि ८(अ) अंतर्गत सरकारी आदेशाद्वारे संबंधित प्लॉट संलग्न संपत्ती म्हणून घोषित करण्यात आली होती. या निर्णयाची माहिती लेखी स्वरूपात आरोपीला देण्यात आली होती. तरीसुद्धा आरोपीने रोख व्यवहार करून खेड येथील सहनिबंधक कार्यालयात विक्री करारनामा करून ४ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांना मालमत्ता विक्री केली.
ही विक्री शासनाच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करून, जाणूनबुजून शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने करण्यात आली, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गुमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.