न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड | गुरुवार ९ ऑक्टोबर २०२५ :- चिंचवड येथील रामनगर परिसरात बॅनर लावण्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे आणि धमकी देणे यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटना ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० ते ७.४५ वाजण्याच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळ, रामनगर, चिंचवड येथे घडली. या प्रकरणी एका महिलेनं फिर्याद दिली असून, तिच्या मुलावर हल्ला करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या मुलाचे नाव समीर जाधव असून, दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचा आरोपींशी बॅनर लावण्याच्या वादावरून बाचाबाची झाली होती. त्यातून वैर निर्माण झाले होते. याच कारणावरून आरोपींनी समीरवर जिवे मारण्याचा प्रयत्न करत कोयता व पालघन सारख्या धारदार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – अक्षय राजू कापसे (रा., चिंचवड), समीर ऊर्फ सम्या उत्तम गवळी (वय १९, रा. काळेवाडी ), मोन्या ऊर्फ शशांक अनंत लांडगे (वय १९, रा. रावेत), आणि शिवा बाबासाहेब बनसोडे (वय १९, रा., थरमॅक्स चौक).
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक २, ३ आणि ४ यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.