- आता चाकणकर ‘इरेला पेटले’; पीएमआरडीए प्रशासनाची सारवासारवही निष्फळ?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. १० ऑक्टोबर २०२५) :- चाकण औद्योगिक परिसरातील सततची वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि विकासकामांचा रखडलेला वेग याविरोधात संतप्त नागरिक, उद्योग प्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी ‘ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती’च्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) पीएमआरडीए कार्यालयावर मोर्चा काढला. संग्रामदुर्ग किल्ल्यापासून निघालेल्या या मोर्चाने तळेगाव चौक, आळंदी फाटा, धर्मवीर स्मारक, भक्ती-शक्ती चौक मार्गे आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालय गाठले. “आश्वासन नको, कामे करून दाखवा”, “चाकणचा श्वास मोकळा करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे यांच्यासह शेकडो नागरिक आणि कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. त्यानंतर शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन समस्यांचा भडीमार केला. एमआयडीसी, महामार्ग प्राधिकरण आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला.
चाकण परिसरात वाहतूक कोंडीमुळे गेल्या काही वर्षांत १७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगून आंदोलकांनी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. पीएमआरडीए स्थापन होऊन वर्षे उलटली तरी केवळ रुंद रस्त्यांचे आरक्षण कागदावर असून प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नाही, असे सांगण्यात आले. “चाकणचा श्वास वाहतुकीच्या गोंधळात अडकला आहे, केवळ अतिक्रमण काढण्यापुरते पीएमआरडीएचे काम मर्यादित राहू नये, ठोस कृती दाखवा,” अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी बैठकीत केली.
आमदार बाबाजी काळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावत म्हटले की, “महामार्ग प्राधिकरण आणि एमआयडीसीने नेमके काय केले, या कामांना किती वेळ लागणार, याचे स्पष्ट उत्तर द्यावे. नागरिकांची सहनशक्ती संपत आली आहे.” आंदोलकांनी एमआयडीसीमधील भ्रष्टाचार, निकृष्ट कामे आणि बोगस बिलिंगबद्दल गंभीर आरोप केले. इलेक्ट्रिकल, साफसफाई, हाउसकिपिंग यांसारख्या सेवांवर कोट्यवधी रुपये खर्च दाखवले गेले असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. २० टक्के कमी दराने निविदा मिळवणाऱ्या ठेकेदारांनी कामाची पातळी खालावली असून त्याचे परिणाम उद्योग व नागरिक दोघांनाही भोगावे लागत आहेत, असा आरोप करण्यात आला.
पुणे–नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर या भागात चुकीच्या पद्धतीने बांधलेले दोन पूल तातडीने पाडावेत आणि रस्ता रुंद करावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. “पूल पाडण्यासाठी मशिनरी आम्ही देतो, फक्त निर्णय घ्या,” असे म्हणत आंदोलकांनी प्रशासनावर दबाव आणला.
या सर्व घडामोडींनंतर पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी विकासकामांबाबत सविस्तर सादरीकरण केले. नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यान उन्नत मार्गाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून ती पुढील सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. १४.०१ हेक्टर जमीन संपादन प्रक्रिया सुरू असून त्यापैकी १०.२३ हेक्टर पीएमआरडीएने आणि ३.७८ हेक्टर पिंपरी-चिंचवड महापालिकेने संपादित करायची आहे. सात गावांपैकी चार गावांचे संयुक्त मोजमाप पूर्ण झाले असून उर्वरित तीन गावांची प्रक्रिया सुरू आहे. चाकण–तळेगाव–शिक्रापूर मार्ग, ट्रक टर्मिनल आणि बाह्यवळण रस्त्यांच्या कामांसाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत पीएमआरडीएने २५० कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे प्रस्तावित असल्याची माहिती दिली असून काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे प्रशासनाकडून लेखी उत्तर देण्यात आले. मात्र, आंदोलकांनी या सर्व आश्वासनांना फोल ठरवत “प्रत्यक्ष कृतीच हवी, अन्यथा जनआंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा दिला.
‘ट्रॅफिकमुक्त चाकण’चा लढा प्रशासनाने गांभीर्याने घेतला नाही, तर हा आवाज रस्त्यांवरून थेट मंत्रालयापर्यंत पोहोचेल, असा निर्धार नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.