- दिवाळीनंतर सोडत होण्याची शक्यता, प्रभागनिहाय आरक्षण ठरणार निर्णायक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १० ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीकडे शहरातील सर्व राजकीय इच्छुकांचे लक्ष लागले आहे. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) तसेच खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित जागांचे गणित ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही सोडत दिवाळीनंतर काढली जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या ३२ प्रभागांमध्ये एकूण १२८ जागा असून, त्यातील सहा प्रभागांत बदल करण्यात आले आहेत. लोकसंख्या आणि अनुसूचित वर्गांच्या आकडेवारीतील बदलांमुळे काही प्रभागांचे आरक्षण बदलले आहे. शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ असून, त्यात एससी लोकसंख्या २ लाख ७३ हजार ८२० व एसटी लोकसंख्या ३६ हजार ५३५ आहे.
यावरून सुमारे २० जागा अनुसूचित जातींसाठी, ३ जागा अनुसूचित जमातींसाठी, ३५ ओबीसींसाठी आणि ३५ खुल्या गटातील महिलांसाठी राखीव राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आरक्षण सोडत चिचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पारदर्शक पद्धतीने होईल. अद्याप राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम प्राप्त झालेला नसला, तरी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली असल्याचे महापालिकेचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.