न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- महामेट्रोच्या वतीने पिंपळे गुरव येथील कास्टिंग यार्डातून पवना नदीपात्रात राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे जल प्रदुषण होत आहे. सदर राडारोडा तत्काळ काढून घेण्याची नोटीस नुकतीच राष्ट्रीय हरित लवादाने महामेट्रोस दिली आहे.
महामेट्रोकडून रेंजहिल्स ते पिंपरी पुणे मेट्रो मार्गिकचे काम सुरू आहे. त्यासाठीचे सेगमेंट निर्मिती पिंपळे गुरव येथील कास्टिंग यार्डमध्ये सुरू आहे. यातील राडारोडा शेजारच्या पवनानदी पात्रात टाकला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास होत असल्याच्याही तक्रारी आहेत. परिसरातील हाउसिंग सोसाट्यांमधील सदनिका व घरांमध्ये काँक्रीटची धूळ पोहचत असून, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी आहेत.
त्याची दखल घेऊन राष्ट्रीय हरित लवादाने महामेट्रोस नोटीस बजावली आहे. मेट्रो कामात निर्माण होणारा बांधकाम व इतर राडारोडा कोठेही टाकून प्रदूषणात भर न टाकण्याची ताकीद देण्यात आली आहे. नदी पात्रात राडारोडा टाकला असल्यास तो पावसाळ्यापूर्वी तत्काळ काढून घ्यावा, असेही बजावण्यात आले आहे. काम करताना कोणत्या प्रकाराचे प्रदूषण होणार नाही या संदर्भातील उपाययोजना व खबरदारी घेण्याचे निर्देशही लवादाने दिले आहेत.













