- साडी व भेटवस्तू देऊन केला शहरातील महिला पोलिसांच्या सेवेला सलाम…
- उद्योजक दिपक मोढवे पाटील यांचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. १५ ऑक्टोबर २०२५) :- दिवाळी हा आनंद, स्नेह आणि कृतज्ञतेचा सण! या सणाच्या पार्श्वभूमीवर समाजरक्षणासाठी दिवस-रात्र तत्पर राहणाऱ्या महिला पोलिसांचा सन्मान करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात आला. शहर भाजपा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष तथा उद्योजक दिपक मोढवे पाटील यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महिला पोलिसांना साडी आणि दिवाळी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान सोहळा मोढवे पाटील यांच्या कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणात पार पडला. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक केकान साहेब, उद्योजक दिपक मोढवे पाटील, शहरातील विविध पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी, इसीआरएस कंपनीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिपक मोढवे पाटील म्हणाले की, “आपल्या समाजातील शांतता, शिस्त आणि नागरिकांचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यात महिला पोलिसांचे योगदान अतुलनीय आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या या महिला पोलीस भगिनी समाजाच्या खऱ्या दीप आहेत. त्यांची सेवा आणि समर्पण या सणाच्या काळात सर्वांनी ओळखले पाहिजे. हा सन्मान म्हणजे त्यांच्या अथक परिश्रमांना आमचा सलाम आहे.”
कार्यक्रमात अनेक महिला पोलिसांनीही आपले अनुभव शेअर करत समाजाकडून मिळालेल्या या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “हा सन्मान आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देईल,” अशा प्रतिक्रिया यावेळी महिला पोलिसांकडून व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारीबरोबरच पोलिसांप्रती आदरभाव वाढविण्यास नक्कीच मदत मिळेल.












