- पीएमआरडीच्या भूखंडांची बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याचा अजित पवारांकडून गौप्यस्फोट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी, (दि. १५ ऑक्टोबर २०२५) :- रहाटणीमध्ये आयोजित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘जनसंवाद’ उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सत्रात तब्बल ३ हजार तक्रारी नोंदविण्यात आल्या, तर त्यापैकी १२०० प्रकरणांवर तत्काळ निर्णय घेण्यात आला. विविध विभागांच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी तक्रारींची थेट दखल घेत कारवाई सुरू केली.
या तक्रारींमध्ये महसूल, समाजकल्याण, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज वितरण, बांधकाम परवानग्या, पोलीस, वाहतूक आणि सहकारी संस्था अशा विभागांशी संबंधित अनेक स्थानिक प्रश्नांचा समावेश होता. प्रत्येक विभागाला सुमारे २०० अर्ज प्राप्त झाले असल्याचे समजते.
राज्यातील ‘जनसंवाद’ मालिकेतील हा चिंचवडमधील चौथा कार्यक्रम ठरला. याआधी हडपसर, पिंपरी आणि खडकवासला येथे झालेल्या सत्रांसह एकूण १५ हजार तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार २०० प्रकरणांचे त्वरित निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींवर विभागीय कार्यालयांकडून पाठपुरावा सुरू आहे.
या कार्यक्रमात नागरिक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकाच छताखाली आले होते. यावेळी व्हॉट्सअॅप चॅटबॉट, हेल्पलाइन नंबर आणि डिजिटल किऑस्क यांच्या माध्यमातून तक्रारी नोंदविण्याची व त्यांच्या स्थितीची माहिती मिळविण्याची सुलभ व्यवस्था करण्यात आली होती.
या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “प्रत्येक अर्जाची नोंद घेऊन संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत. काही ठिकाणी पीएमआरडीएकडील भूखंडांची बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याची तक्रार आली असून, अशा प्रकारची जमीन खरेदी करणे चुकीचे आहे. नागरिकांनी सावध राहावे.”
ते पुढे म्हणाले, “सर्व अर्जांवर काटेकोर पाठपुरावा केला जाईल. शंभर टक्के काम पूर्ण होईल असे सांगत नाही, पण शक्य तितके काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समन्वयातून पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.”












