न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- देवदर्शनासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरात साडेदहा लाखांची चोरी झाली. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १० लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना बुधवारी (दि. २९) रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास पुनावळे येथे उघडकीस आली.
या प्रकरणी गितेश प्रकाश बोरगे (२६, रा. पुनावळे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गितेश हे शेतकरी असून, ते पुनावळे येथे शेती करतात. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ते देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी बनावट चावीच्या साह्याने कुलूप उघडून घरात प्रवेश केला.
घरातील कपाटात ठेवलेले ३३. ५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १० लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. गितेश रात्री पावणेदहाच्या सुमारास घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ हिंजवडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.













