न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १ जून २०१९) :- वाकड परिसरातील डांगे चौक ते हिंजवडी रस्त्यावरील भूमकर चौकामध्ये पुलाखाली वारंवार मैलामिश्रीत पाणी साचत आहे. शुक्रवार (दि. ३१) रोजी असाच प्रकार घडला. जणू पुलाखालून नाला वाहत असल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून वाहतूक संथगतीने सुरू होती. सातत्याने हा प्रकार घडूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथून ये-जा करणाऱ्या आयटीयन्सने नाराजी व्यक्त केली.
काळाखडक येथील ड्रेनेज तुंबल्याने सर्व मैलामिश्रीत पाणी भूमकर चौकातील अंडरपास पुलाखाली साचले होते. मागील महिनाभरात वारंवार हा प्रकार घडत आहे. डांगे चौक – हिंजवडी रस्ता राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानाला जोडणारा महत्त्वाचा आणि अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. या ठिकाणाहून दररोज लाखो नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त आयटीनगरीत येत असतात. यामध्ये विदेशी पाहुण्यांचाही समावेश असतो. काळाखडक झोपडपट्टी लगत असणारा रस्त्यालगतचा ड्रेनेज नेहमीच प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स, कचरा, दगड, माती मुळे तुंबत असतो त्यामुळे सर्व मैलामिश्रीत पाणी बाहेर रस्त्यावर पसरले जाते. महापालिकेकडून साफसफाई होते. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
भूमकर चौकातील पुलाखाली मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी साचून राहिल्याने विशेषतः दुचाकी वरून प्रवास करणाऱ्यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. अक्षरशः कसरत करीत वाहने चालवावी लागतात. पादचाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट होते. शेजारून जाणाऱ्या वाहनांमुळे मैलामिश्रीत पाणी त्यांच्या अंगावर उडते. त्यातून वाद होत आहेत. या पाण्याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. संथगतीने वाहने चालवावी लागतात. परिणामी वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहतूक कोंडी झाल्यावर दुचाकीस्वारांना जवळपास एक फूट मैलामिश्रीत पाण्यात पाय ठेवून उभे रहावे लागत असल्याने आयटीयन्स सहित सर्वसामान्य नागरिक प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. अनेक वेळा वाहतूक पोलिसांना देखील वाहतूक नियमन करताना दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. वारंवार ही समस्या उद्भवून देखील महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.













