न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत शिलाई मशीन, मोफत सायकल योजना, चलन – वहन साहित्य योजनेसाठी अर्ज करणाऱ्या ११०० लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत.
या योजनेला कागदोपत्राअभावी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना २० जूनपर्यंत अर्थसहाय देण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सुचना स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांनी दिल्या. तसे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिले आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मितीस सक्षम बनविण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. उद्योग क्षेत्रात आर्थिक हातभार म्हणून पालिकेच्या वतीने महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यावर पालिकेकडे ७५० शिलाई मशीन, २५० सायकल आणि दिव्यांग व्यक्तीचे १०० सायकली अशा एकूण १ हजार १०० लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत.
शिलाई मशिनचे आर्थिक सहाय घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना मशिन खरेदी केल्याची जीएसटीची पावती आणि बँक खात्याचा तपशील सादर सुचना केल्या होत्या. लाभार्थ्यांनी मशीन खरेदी केल्याची जीएसटी पावती सादर केली. काही अर्जदारांना ही पावती आणि बँक खात्याचा तपशील सादर करणे शक्य झाले नाही. नागरिकांना अडचण निर्माण झाल्याने त्यांनी नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी जीएसटीची पावती आणि बँकेचा तपशील सादर करण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली. त्यावर ही मुदतवाढ २० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती स्थायी सभापती मडेगिरी यांनी दिली.













