न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- मध उद्योगास चालना मिळावी यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘मध योजना’ या महत्वकांक्षी योजनेस मंजुरी देण्यात आली. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे उपसभापती हेमंत तापकीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.
यासंदर्भात बोलताना तापकीर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योगाच्या विकास आणि प्रचारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. ‘मध योजना’ हा मंडळाचा एक महत्वकांक्षी कार्यक्रम असून राज्यात मध केंद्र योजना राबविणे, शेती व्यवसायास पूरक योजना म्हणून मध उद्योगास चालना देणे, मधपेट्यांच्या उत्पादनांद्वारे रोजगारात वाढ करणे, मधमाशा उद्योगास चालना देणे तसेच या उद्योगास आवश्यक असणारी पदनिर्मिती करणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.
मध योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महामंडळ कटिबद्ध असून या योजनेच्या अंमलबजावणीतुन राज्यात मध उद्योगाचा प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणात होईल. आणि त्यामधून रोजगारनिर्मिती व ग्रामोद्योगाचाही प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल, असा विश्वास महामंडळाचे सभापती हेमंत तापकीर यांनी यावेळी व्यक्त केला.