न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील कस्पटे वस्ती येथे वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकही हैराण झाले आहेत. या परिसरातील महत्त्वाच्या छत्रपती चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असून, भाजीवाले, फळवाले, पाणीपुरी चालकांच्या मुजोरीमुळे त्यात आणखीनच भर पडत आहे. या चौकात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहतुकीला शिस्त लावताना अडचणी येत असून, वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत असल्याची बाब राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी वाहतूक पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
याबाबत त्यांनी वाकड पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, मौजे वाकड (कस्पटे वस्ती), येथील छत्रपती चौक या परिसरात नियमित ट्राफिक जाम होते. तरी, सदर ठिकाणी रस्त्याचे काम चालु झाले असून, सिग्नल नसल्याकारणामुळे सदर चौकात ट्राफीक जाम होवून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भाजीवाले, फळवाले, पाणापुरीवाले यांचे गाडे असल्यामुळे पादचा-यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. तरी मे. साहेबांना विनंती की, मौजे वाकड (कस्पटे वस्ती), येथील छत्रपती चौक या परिसरात तूर्तास सिग्नलची उभारणी करण्यात यावी व आवश्यक त्या सिग्नल यंत्रणा तातडीने कार्यान्वित कराव्यात. जेणेकरून या परिसरातील वाढती वाहतूक कोंडी व वाहनचालकांची डोकेदुखी थांबेल, असे या पत्रात कस्पटे यांनी म्हटले आहे.













