न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- आजच्या या २१ व्या शतकात छत्रपती शिवराय-शंभूराय अनं स्वराज्यातील गडकोट हे जनमानसात आजही आपले मुख्य प्रेरणास्त्रोत अनं ऊर्जस्त्रोत आहेत. आजची पिढी ही भाग्यवान आहे ज्यांना हे गडकोट पहायला मिळतं आहेत. पण पुढच्या पिढीचे काय..? म्हणून आज जर हे गडकोट आपण वाचवले नाही तर आपल्या पुढील पिढीने हा अमूल्य वारसा कसा पहायचा…?? ही सल मनात सतत सलत होती. म्हणून आज हे ”गडकोट वाचले तर, आपला इतिहास वाचेल” या भावनेतून श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे. यांच्यातर्फे (दि. २५ मे ते २६ मे) दरम्यान किल्ले तुंग उर्फ कठीणगडवर दुसरी संवर्धन मोहीम घेण्यात आली.
या मोहिमेत गडाचा दुसरा गोमुखी बांधणी असलेला हनुमान दरवाजा व बुरुज-बुरुजांच्या जंग्या यांमधील बांधकामास धोकादायक गवत अनं झाडे योग्यरितीने काढण्यात आली. या कामामुळें पावसाळ्यात पाणी जलदरीत्या वाहून जाण्यास मदत होईल व या बांधकामास काही धोका राहणार नाही. पुढे हनुमान दरवाज्याच्या वरच्या भागातील मावळ्यांना राहण्याच्या जागेच्या जोत्यांची साफसफाई करण्यात आली.
गडाच्या मधल्या टप्प्यावरील ठळक अवशेष गणपती मंदिर परिसर, वाडावजा असणारे बांधकाम, न्हाणीघर, पाण्याचे टाके परिसराची साफसफाई केली गेली. शिवाय पावसाळाही आता महिन्यावर आल्याने अन पावसाळ्यात गडावर पाऊस अन धुक्याचे अनं पर्यटकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वाट चालताना पायाखाली दगड येऊन अपघात होण्याची शक्यता असते. हा धोका लक्षात घेता गड मार्गावरील विखुरली गेलेली दगडे व्यवस्थित एकेठिकाणी रचून ठेवण्यात आली. यामुळे अपघाताचा धोका थोडा कमी होईल.
या तुंग संवर्धन मोहिमेचे नियोजन श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे च्या वतीने केले होते. या मोहिमेत पुण्यातील गडझुंजार प्रतिष्ठाण मधून ४० युवक-युवती मोहिमेत सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे ट्रेकर्स अड्डा, पुणे या ग्रुपचे १० ट्रेकर्सही सहभागी झाले होते. या मोहिमेसाठी श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने हनुमंतराव देशमुख, आकाश मारणे, सागर शिंदे, दर्शन वाघ, विजय खैरे, अजय साळुंखे, गोरख माझिरे, तिकोणा किल्ल्याचे गडपाल सुजित मोहोळ, संतोष गोलांडे यांनी पुढाकार घेतला.गडझुंजार प्रतिष्ठानच्या अमृत पाटील, प्रशांत भोसले आणि ट्रेकर्स अड्डा चे श्री. मोकाशी यांनीही यासाठी पुढाकार घेतला.
आपले गडकोट ही आपली बलस्थाने आहेत. ती आपणच वाचवली पाहिजे. या जाणीवेतून पून्हा जून महिन्यात दुसऱ्या रविवारीही किल्ले तुंग संवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे. तेव्हा ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल, तसेच कोणास काही मदत करायची असेल, तर श्री शिवदुर्ग संवर्धनचे संतोष गोलांडे ९०११०१९३९२, दर्शन वाघ ९८२२३१०७१३ यांच्या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.













