न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहुगाव (दि. 28 नोव्हेंबर 2025) :- मुलांच्या सुंदर भविष्याची पायाभरणी शालेय जीवनात होते. ज्ञानाला अमृत तर शिक्षणाला प्रगतीचे प्रवेशद्वार म्हटले जाते. ज्ञानाने, मनाने आणि संस्काराने संपन्न असणारे विद्यार्थी राष्ट्राचे नाव उंच करतात. ध्येयवादी शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी हे ज्ञानसंस्कृतीचे उपासक असतात असे प्रतिपादन सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, लेखक, विचारवंत डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाउंडेशनने अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आयोजित केलेल्या सृजनदीप व्याख्यानमालेत ‘संस्काराचे सामर्थ्य’ या विषयातून उपस्थित विद्यार्थी व पालकांशी डॉ. पाटणे सरांनी संवाद साधला.
सृजनदीप व्याख्यानमाला संत तुकोबांच्या भूमितीतील विचारांची दिवाळी आहे. जीवनात निरंतर दिवाळी साजरी करण्यासाठी अंतःकरणात विवेकदीप प्रज्वलित केला पाहिजे. संस्कार जीवनाला आकार देतात. संस्कार मनाला सदविचारांच्या वाटेने प्रवास करण्यासाठी अखंड प्रेरित करून जीवनाला सामर्थ्य प्रदान करतात. अशा व्याख्यानमाला सदविचारांचा दीप मनामनांतून प्रज्वलीत करून जीवनाच्या प्रांगणात आनंदाचा दीपोत्सव करत असतात. जीवनाच्या संघर्षातही स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असतात. सृजनदीप व्याख्यानमाला ही नावाप्रमानेच विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनातून मांगल्याचा, चैतन्याचा सृजन अविष्कार घडवित आहे. सध्या अतिरेकी चंगळवादामुळे तरुणाई दिशाहीन होत चालली आहे तर मूल्यरहीत राजकारणामुळे शिक्षण, शेती, रोजगार हे प्रश्न बाजूला पडले आहेत. अशा काळात समाजमनावर सदविचारांचे संस्कार झाले तर सुसंस्कृत पिढी निर्माण होईल अशा भावना डॉ. पाटणे सरांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.
संस्काराचे सामर्थ्य हेच माणसाचे खरे वैभव असते. सृजन फाउंडेशन हे मराठी संस्कृतीशी अभंग नाते जपत अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे असे पाटणे सरांनी सांगितले.
या सृजनदीप व्याख्यानमालेचे उद्घाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव सतीशराव उरसळ यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. देहूचे सुपुत्र व राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे सर यांनी शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांचा निश्चितच बहुजन समाजातील मुलांना लाभ झाला आहे. मोरे साहेबांचा सहवास आम्हाला लाभला त्यामुळे शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची ऊर्जा आम्हाला मिळाली असे मोरे साहेबां प्रति कृतज्ञता व्यक्त करीत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव सतीशराव उरसळ यांनी अध्यक्षीय भाषणातून आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतक करीत सृजन फाउंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी श्री. उरसळ साहेबांनी शुभेच्छा दिल्या.
या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी देहूच्या नगराध्यक्षा सौ. पूजा दिवटे, पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ साहित्यिक, सुप्रसिद्ध वक्ते राजेंद्र घावटे, देहूचे माजी सरपंच मधुकर कंद, ज्योतिषाचार्य दत्तात्रय अत्रे, देहू योग विद्या धामचे दत्तात्रय भसे, सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार संजय भसे, उद्योजक सुरेश काळोखे, सेवानिवृत्त शिक्षक शिंदे गुरुजी, शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद आदी मान्यवर या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद, व्याख्यात्यांचा परिचय सहशिक्षिका सौ. विनिता कुलकर्णी व आभार सौ. अर्चना कांबळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. वृषाली आढाव यांनी केले.
















