- केएसबी चौकात सापळा रचत लाच स्वीकारताना दोघेही रंगेहात अडकले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२५) :- पिंपरी वाहतूक विभागातील महिला पोलिस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डन यांनी रिक्षा चालकाकडून ४०० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेले आरोपी म्हणजे महिला पोलिस अंमलदार वर्षा विठ्ठल कांबळे (३५) आणि ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा मछिंद्र गव्हाणे (२८) हे दोघे आहेत. तक्रारदार हा रिक्षाचालक असून तो पिंपरी–मोरवाडी, केएसबी चौक परिसरात प्रवासी वाहतूक करतो.
१७ नोव्हेंबर रोजी जादा प्रवासी घेतल्याच्या कारणावरून आरोपींनी तक्रारदाराकडून ३०० रुपये घेतले होते. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी पुन्हा रिक्षा अडवून दरमहा ‘हफ्ता’ म्हणून ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने ACB कडे तक्रार दाखल केली.
पडताळणीदरम्यान आरोपींकडून ४०० रुपयांची लाच मागणी स्पष्ट झाली. त्यानुसार शनिवारी केएसबी चौकात सापळा रचण्यात आला. यावेळी ट्रॅफिक वॉर्डन गव्हाणे यांनी तक्रारदाराकडून ४०० रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना ACB पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर महिला पोलिस शिपाई वर्षा कांबळे हिलाही ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केली.
















