- कामगार, सामाजिक आणि संघटनात्मक कार्य ठरतेय जमेची बाजू..
- पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शाहूनगर (दि. 07 डिसेंबर 2025) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 10 (शाहुनगर–संभाजीनगर-मोरवाडी-विद्यानगर) या प्रभागातून पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष अजित सुदाम भालेराव यांना सर्वसाधारण गटातून भाजपची उमेदवारी मिळू शकते. त्यांच्या नावाची चर्चा प्रभागात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
कामगार संघटन, सामाजिक उपक्रम व संघटनवाढ या तिन्ही स्तरांवर सातत्याने काम केल्याने भालेराव यांनी प्रभागात मजबूत जनाधार निर्माण केला आहे.
सन 2000 पासून भालेराव हे भाजपमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी पक्षात स्थानिक पातळीवर शहर उपाध्यक्ष ते मंडल अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वारियर अशा विविध आघाड्यांवर काम केले आहे.
याशिवाय थरमॅक्स कामगार संघटनेचे उपाध्यक्ष, आपला परिवार सोशल फाउंडेशनचे सचिव, शिवशंभो फाउंडेशनचे माजी अध्यक्ष, तसेच आंबेगाव तालुका मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. प्रभागातील कामगार, तरुण, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांचा थेट संवाद असल्यामुळे ते या प्रभागात भाजपचे प्रबळ दावेदार ठरले आहेत.
भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून भालेराव ओळखले जातात. प्रभागातील संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद, पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रसार आणि विविध उपक्रमात सक्रिय सहभाग अशा भूमिकांमुळे पक्षातही त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे. स्थानिक प्रश्नांवर त्यांनी केलेले पाठपुरावे आणि तत्पर प्रतिसाद यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या नावाला चांगली प्रतिमा लाभली आहे.
प्रभागात सध्याचे राजकीय समीकरण पाहता भालेराव यांचे नाव भाजपकडून ‘मजबूत दावेदार’ म्हणून पुढे येत असून, त्यांच्या उमेदवारीची घोषणा पक्षाकडून होण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.














