- १२८ जागांसाठी तब्बल साडेसहाशेपेक्षा अधिक अर्ज..
- अर्जांची पडताळणी करून प्रदेश कार्यालयाकडे पाठविणार – शत्रुघ्न काटे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२५) :- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला इच्छुक उमेदवारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी अर्ज वितरणाचा शेवटचा दिवस संपला असता, एकूण १२८ जागांसाठी ६५० हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात घेतलेल्या आढावा बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कोअर कमिटी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी सर्व इच्छुकांनी अर्ज घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले होते.
मोरवाडी, पिंपरी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयातून आतापर्यंत साडेसहाशेहून अधिक अर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी दिली.
शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, इच्छुकांनी निर्धारित मुदतीत अर्ज घेऊन वेळेत जमा करावेत. अर्जांची छाननी व पडताळणी केल्यानंतर ते प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. “ऐनवेळी आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या अर्ज वितरण प्रक्रियेला मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
















