- पोलिस आयुक्तांचा बेधडक निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसेंबर २०२५) :- दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करून ४६ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना अटक झालेल्या पोलिस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ३५, रा. भोसरी) याला तडकाफडकी शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सोमवारी याबाबतचे आदेश जारी करत कठोर कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी याची जानेवारी २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागात नियुक्ती झाली होती. आर्थिक गुन्हे शाखेकडे तब्बल चार कोटींच्या फसवणुकीचा एक गंभीर गुन्हा तपासासाठी प्रलंबित होता. या प्रकरणातील एका संशयिताला मदत करण्यासाठी चिंतामणी यांनी त्याच्या वकिलाकडे दोन कोटींची लाच मागितल्याचे उघड झाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ४६ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहात पकडले होते. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने आयुक्तांनी कठोर निर्णय घेत चिंतामणी याला तत्काळ सेवेतून बडतर्फ केले.
या कारवाईमुळे दलात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्टाचारावर पोलिस प्रशासनाची शून्य सहनशीलतेची भूमिका अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
















