- गप्पा, गोष्टी आणि बहारदार मनोरंजनासह आकर्षक बक्षिसांची मेजवानी..
- महिलांनो मोठ्या संख्येने सहभागी व्हा; मोनिका नढे यांच आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १० डिसेंबर २०२५) :- जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथदादा नढे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मोनिका नवनाथदादा नढे पाटील यांच्या वतीने प्रभाग क्रमांक २२ मधील महिलांसाठी खास मनोरंजनमयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘गप्पा + गोष्टी + मनोरंजनांचे खेळ’ यांसह ‘न्यू होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा’ हा आकर्षक कार्यक्रम शनिवार, १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विष्णुराज मंगल कार्यालय, ज्योतिबानगर येथे रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण सिने अभिनेत्री पुजाताई काळभोर करणार आहेत.
कार्यक्रमात विजेत्या ठरणाऱ्या स्पर्धकांसाठी भव्य बक्षिसांची रेलचेल असणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ई-बाईक व मानाची पैठणी, द्वितीय क्रमांक फ्रीज, तृतीय क्रमांक ४३ इंची टीव्ही, तर चौथा आणि पाचवा क्रमांक अनुक्रमे वॉशिंग मशीन व मिक्सर अशी उत्तम बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत आकर्षक बक्षिसे आणि लकी ड्रॉ विजेत्यास सोन्याची नथ देण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तूही दिली जाणार आहे.
हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून महिलांना एकत्र आणण्याचा आणि आनंद वाटण्याचा सुंदर प्रयत्न आहे. या उपक्रमात प्रभागातील सर्व बहिणींनी सहभागी व्हावे, आपल्या मैत्रिणींनाही सोबत आणावे, असे आवाहन मोनिका नवनाथदादा नढे पाटील यांनी केले आहे.












