- स्वार्थाच्या राजकारणात निष्ठेला मिळतेय कवडीची किंमत..
- निष्ठा सोडून पक्षांतर केल्याने काय साध्य होतं?..
- मतदारांसमोर काय आदर्श ठेवतोय? याचंही जरा भान हवचं…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ डिसेंबर २०२५) :-पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. निवडणुकीची चाहूल लागताच शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या सत्ताधारी महायुतीत भाजपची पकड मजबूत असल्याचे चित्र दिसत असल्याने अनेकांचे लक्ष भाजपकडे वळले आहे.
महाविकास आघाडी असो किंवा महायुतीतील इतर घटक पक्ष — अनेक इच्छुक नेते “भाजपमध्ये गेलो तर उमेदवारी मिळेल” या आशेने पक्षांतर करत आहेत. प्रचार फेरी, बैठका, संपर्क कार्यक्रम यात स्वतःची छबी तयार करण्याची धडपड सुरू आहे. पण वास्तव इतके सोपे नाही.
भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे उमेदवारी हमखास मिळते, हा समज चुकीचा ठरत आहे. पक्षात आधीपासून काम करणारे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते, माजी पदाधिकारी आणि सक्रिय नेते यांच्यासोबतच नव्याने आलेले चेहरेही उमेदवारीसाठी रांगेत उभे आहेत. त्यामुळे उमेदवारीची स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.
अनेकांनी आपल्या जुन्या पक्षांवर नाराजी व्यक्त करून भाजपकडे धाव घेतली. पण परतीचा रस्ता स्वतःच बंद केल्याने आता ते संभ्रमात आहेत. नव्या पक्षात स्थान मिळेल की नाही, तिकीट मिळेल की नाही याचीच चिंता त्यांना सतावत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीही व्यक्त होताना दिसत आहे.
भाजपच्या निष्ठावंतांनी मागील काही वर्षांत संघटन वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. मात्र या गर्दीत पक्षातीलच निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला पडत आहेत आणि अचानक आलेले चेहरे पुढे येत आहेत, अशी चर्चा तळागाळात सुरू आहे. “आपण वर्षानुवर्षे पक्षाचे काम केले, मग आपले काय?” असा प्रश्न भाजपमधील अनेक जण आज विचारताना दिसतात.
राजकारणात बदल हा कायम असतो. आज भाजपची लाट आहे; उद्या परिस्थिती वेगळीही असू शकते. त्यामुळे फक्त पद, तिकीट किंवा सत्ता यासाठी पक्ष बदलण्यापेक्षा आपण जिथे आहोत तिथे निष्ठेने काम करणे योग्य, अशी भावना तळागाळातुन व्यक्त होत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्य महत्त्वाचे. पक्ष बदलून स्वार्थ साधण्यापेक्षा लोकांसाठी शांतपणे काम करणेच खरी प्रतिष्ठा देतं आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो. मतदारांनी देखील निर्णय घेताना या मूल्यांकडे पाहिले तर लोकशाही अधिक मजबूत होईल.
निवडणुकीच्या काळात पक्षांतराचा ओघ सुरूच राहील. पण शेवटी, उमेदवारी पेक्षा निष्ठा आणि विश्वास यांचीच खरी परीक्षा होणार आहे, हे चित्र या घडामोडींमधून स्पष्ट होताना दिसते.












