- शिवसेना उमेदवार सुजाता नखाते व गौरव नढे यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ४ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्र. २२ काळेवाडी परिसरातील रहिवाशांच्या मागील १५-२० वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून आता शिवसेनेची ‘मशाल’ पेटविण्याची वेळ आली असल्याचे, आमदार तथा शिवसेना संपर्क नेते सचिन अहिर यांनी सांगितले.
प्रभाग २२ चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुजाता नखाते (सर्वसाधारण महिला) आणि गौरव नढे (सर्वसाधारण पुरुष) यांच्या निवडणूक कचेरीचे भव्य उद्घाटन आमदार तथा शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना अहिर म्हणाले की, “काळेवाडीतील रस्ते, पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि नदी प्रदूषणासारख्या अनेक समस्यांचा अंधकार दूर करण्याची वेळ आता आली आहे. शिवसेनेची मशाल हा विकासाचा प्रकाश घेऊन आली आहे. आमचे दोन्ही उमेदवार काळेवाडीकरांच्या या समस्या कायमच्या दूर करण्यासाठी उभे आहेत आणि आमचे दोन्ही उमेदवार महापालिकेत गेले तर प्रशासनाशी भांडून विकासाची गंगा आपल्या प्रभागात खेचून आणतील” असा विश्वास, अहिर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी प्रभागातील शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, समन्वयक सुशीला पवार, जिल्हाप्रमुख अनिता तुतारे, उपजिल्हाप्रमुख दस्तगिर मणियार, रोमी संधू यांच्यासह प्रभागातील कार्यकर्ते आणि शेकडो रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. या उद्घाटनाने काळेवाडीतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, स्थानिक रहिवाशांमध्येही सत्ता बदलाची अपेक्षा वाढली आहे.












