- रहाटणी–तापकीरनगर–श्रीनगर भागात काढली व्यापक प्रचार फेरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ४ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक १५ जानेवारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ (रहाटणी–तापकीरनगर–श्रीनगर) येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी उमेदवार अर्चनाताई विनोद तापकीर यांच्यासह शनिवारी (दि. ०३) श्रीनगर परिसर, शिवराज नगर परिसर आणि रहाटणी भागात व्यापक प्रचार फेरी काढली.
प्रचारादरम्यान नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रभागातील प्रलंबित प्रश्न, सुविधांची गरज आणि आगामी विकास आराखडा याबाबत नखाते यांनी सविस्तर चर्चा केली. त्यांचा दांडगा अनुभव, प्रशासकीय पकड आणि पूर्वी केलेल्या विकासकामांचा ठसा लक्षात घेऊन मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सोयी, उद्याने आणि सुरक्षिततेवर भर देत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यकर्त्यांचा जोश, महिलांचा सहभाग आणि तरुणांचे समर्थन यामुळे निवडणूक प्रचाराला अधिक उभारी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांनी नखाते यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विकासाला पाठिंबा देण्याची भूमिका दर्शवली.
नखाते म्हणाले “या प्रभागाने मला नेहमीच विश्वास दिला. अनुभव, पारदर्शकता आणि विकास या तिन्हींच्या जोरावर पुढील काळातही काम करण्याचा निर्धार आहे. रहाटणी, तापकीरनगर आणि श्रीनगरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे.












