- गुंठेवारी अटी शिथिल करून नाममात्र दंडात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय..
- उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच नियमितीकरणाची प्रमाणपत्रे..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ जानेवारी २०२६):- पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे दोन लाख अनधिकृत घरांच्या नियमितीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुंठेवारीच्या अटी शिथिल करून आणि नाममात्र दंडात्मक शुल्क आकारून अनधिकृत घरांना लवकरच नियमितीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन लाख नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपताच उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नियमितीकरणाची प्रमाणपत्रे नागरिकांना दिली जाणार आहेत.
याबाबतची माहिती शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गुंठेवारीचा निर्णय घेतला. त्यानुसार घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला. घरे नियमित करताना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आवश्यक असून, त्यानुसार राज्यातील अनधिकृत घरांच्या नियमितीकरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात गुंठेवारी अधिनियम २०२१ अंतर्गत अर्ज दाखल केलेल्या १४०९ अर्जदारांना उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच नियमितीकरणाची प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवडकरांसाठी हा एक ऐतिहासिक निर्णय असून, येत्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या ४५ वर्षांपासून प्रलंबित असलेला घरांच्या नियमितीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडून लवकरच घोषणा..
खासदार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून मी स्वतः या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत हा महत्त्वाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याचे स्पष्ट केले आहे. उद्याच्या सभेत या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे महत्त्वाची घोषणा करणार आहेत, असे खासदार बारणे यांनी सांगितले.
या निर्णयाचा लाभ विशेषतः बिजलीनगर, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, दळवीनगर तसेच चिंचवड परिसरातील दोन लाखांहून अधिक घरांना होणार आहे. गुंठेवारी अधिनियम २०२१ अंतर्गत राज्यातील सर्व अनधिकृत घरे २०२६ पर्यंत नियमित करण्यात येणार आहेत.
श्रीरंग बारणे
खासदार












