- मतदारांच्या सहकार्याने प्रभागात अमुलाग्र बदल घडविण्याचा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा संकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०६ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत स्थानिक नेतृत्व आणि प्रत्यक्ष कामांना महत्त्व देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतदारांचा कल वाढताना दिसतो आहे. प्रभावशाली प्रचार यंत्रणेतून राष्ट्रवादीचे उमेदवार थेटपणे मतदारांपर्यंत आपला संदेश पोहोचवत आहे.
दरम्यान प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अ) मोनिकाताई नवनाथ नढे यांच्यासह ब) उषा दिलीप काळे आणि क) मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर ड) माजी नगरसेवक संतोष कोकणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी सोमवार (दि. ०५) रोजी संघर्ष कॉलनी, गोकुलधाम कॉलनी, पाटील हॉस्पिटल परिसर, नढेनगर आणि कोकणेनगर येथे भेटी देत मतदारांशी हितगुज केली.
मोनिकाताई नढे म्हणाल्या, “महिला, ज्येष्ठ आणि तरुण तिघांच्याही गरजा लक्षात घेऊन काम करायचे आहे. पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती आणि सार्वजनिक सोयी यामधील त्रुटी कमी करणे हे पहिले पाऊल असेल. नागरिकांनी सांगितलेले मुद्दे नोंदवून त्यावर कृती करणे ही आमची जबाबदारी आहे. येत्या १५ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाला आपलं बहुमोल मत देऊन राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करा”, असं आवाहन त्यांनी केलं.












