- राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात विजय निर्धार सभेतून निर्णायक शक्तिप्रदर्शन..
- जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा ही केवळ योजना नाही, तर आमची जबाबदारी – मच्छिंद्र तापकीर..
- जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – मोनिकाताई नवनाथ नढे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०७ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचे आणि प्रगतीचे शिल्पकार, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज काळेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भव्य विजय निर्धार सभा प्रचंड उत्साहात पार पडली. हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीने ही सभा म्हणजे राष्ट्रवादीच्या ताकदीचे आणि जनसमर्थनाचे ठोस प्रदर्शन ठरले.
काळेवाडी आणि परिसर हा कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. केवळ घोषणा नव्हे, तर विकास, विश्वास आणि कामाच्या राजकारणालाच इथली जनता साथ देते, हे या सभेत पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अजित पवार यांच्या ठाम नेतृत्वावर आणि दूरदृष्टीपूर्ण विकासाच्या धोरणावर जनतेचा असलेला विश्वास सभास्थळी स्पष्टपणे दिसून आला.
या संयुक्त विजय निर्धार सभेत प्रभाग क्रमांक २२ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मच्छिंद्र तात्या तापकीर, संतोष कोकणे, मोनिकाताई नवनाथ नढे, उषा काळे या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी जोरदार मार्गदर्शन केले.
अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा केवळ आराखड्यावर नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवा. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा या सर्व बाबींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काम करून दाखवले आहे. लोकांना भुलवणाऱ्या घोषणा नव्हे, तर काम करणाऱ्यांनाच जनता साथ देते. सभेत उपस्थित नागरिकांनी ‘अजितदादा पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, ‘राष्ट्रवादीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारलेला दिसून आला.
प्रभाग २२ क मधील अधिकृत उमेदवार मच्छिंद्र तात्या तापकीर म्हणाले की, “प्रभागातील जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार असून त्यांच्यासाठी आयुर्वेदिक गुडघेदुखी उपचार शिबिरे, मोफत तपासणी, औषधोपचार तसेच नियमित आरोग्य सल्ला सेवा सुरू करण्यात येणार आहे. वयोवृद्ध नागरिकांना घराबाहेर पडताना अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या दारातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. आरोग्य, सन्मान आणि सुरक्षितता हे जेष्ठ नागरिकांसाठी आमचे प्राधान्य राहील.”
उमेदवार मोनिका नढे म्हणाल्या की, “काळेवाडी परिसराचा विकास हा केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही. अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने विकास करून दाखवला आहे आणि येत्या काळातही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे आहोत.”
दरम्यान, “ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर विकासाच्या विचारांची आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काळेवाडी परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.”
या विजय निर्धार सभेने काळेवाडी–परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भक्कम, निर्णायक आणि एकतर्फी पाठिंबा मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विकास, विश्वास आणि नेतृत्वाची ही लढाई आता अधिक तीव्र झाली असून, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा उंचावेल, असा ठाम विश्वास या सभेतून व्यक्त करण्यात आला.












